जळगाव (प्रतिनिधी) : लहानपण म्हणजे मातीचा गोळा असतो, त्याला आकार देणारा पहिला गुरु आईवडील व त्यानंतर शिक्षक असतात. शिक्षक कधी ममतेने तर कधी कठोरतेने या गोळ्याला आकार देवून त्यातून उद्याचा नागरिक घडवतो. कलाभान जागृत असणारे नागरिक घडविणे हे साधेसोपे काम नाही. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी घडवलेले विद्यार्थी एक चांगले नागरिकच नाही तर उत्तम माणूस म्हणून घडले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी केले. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या बालनाट्य संहितांचे पुस्तक प्रकाशन व सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
शहरासह महाराष्ट्रातील विविध शहरात बालनाट्य चळवळ रुजवत ती बहरत ठेवण्याचे कार्य गेल्या ४८ वर्षांपासून करणारे रंगकर्मी, बालनाट्य लेखक – दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या निवडक बालनाट्य संहितांचे प्रकाशन आणि आजवरच्या बालरंगभूमीवरील कार्याचा गौरव म्हणून त्यांना बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘बालरंगभूमी जीवन गौरव’ पुरस्काराने येथील भैय्यासाहेब गंधे सभागृहात झालेल्या सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले.
४५ हून अधिक बालनाट्य व १ दोन अंकी बालनाट्य लिहणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बालनाट्याच्या माध्यमातून बालकांचे भावविश्व फुलवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी लिहिलेल्या बालनाट्यातून अभिनय साकारलेले बालकलावंत आज चित्रपट व व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असून, त्यांचे लेखन अधिकाधिक बालनाट्य संस्था व दिग्दर्शकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या निवडक संहितांचे प्रकाशन शहरातील श्रेयस प्रकाशनातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक चित्रपट निर्माते पुष्कर श्रोत्री यांच्यासह माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, भूगर्भशास्त्रज्ञ सौ.संपदा जोशी, अभिनेत्री अंजली धारु आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली धारु यांनी केले तर योगेश शुक्ल यांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. मान्यवरांच्या हस्ते आम्ही धृव उद्याचे व इथे भुते राहतात या दोन बालनाट्य संग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. या संग्रहात एकूण ७ बालनाट्यांचा समावेश होता. पुस्तक प्रकाशनानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर गायकवाड यांना स्मृतिचिन्ह, शाल, मानपत्र व रोख रक्कम पाच हजार असे स्वरुप असलेल्या बालरंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी रंगमंचावर बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष नेहा पवार, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य दर्शन गुजराथी, ज्ञानेश्वर सोनवणे, सुदर्शन पाटील अवधूत दलाल, मोहित पाटील, भालचंद्र पाटील, उल्हास ठाकरे आदीं उपस्थित होते.
सन्मान सोहळ्यानंतर ज्ञानेश्वर गायकवाड लिखित गाऱ्हाणं, इथे भुते राहतात व आम्ही धृव उद्याचे या बालनाट्य संहितांमधील गाणी व प्रसंगांचे गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालय व नाट्यरंग थिएटर्स जळगावच्या बालकलावंतांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल यांनी तर आभार प्रदर्शन विनोद ढगे यांनी केले.















