जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बहुतांश शहरे आणि गावांमध्ये आज अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतांनाच अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुंबईत आहेत. मात्र आज दिवसभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीवर ते स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नजर ठेवून आहेत. यानंतर त्यांनी जिल्हावासियांसाठी एक संदेश जारी करत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात आणि विशेष करून रावेर आणि यावल तालुक्यात आज अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील शाळांना उद्या म्हणजेच गुरूवारी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आगामी ४० तासांमध्ये अजून अतिवृष्टी होण्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जलसाठ्याच्या आसपास शक्यतो जाऊ नये, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसली तरी सतर्कता बाळगावी असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अतिवृष्टीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून असून वेळ पडल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ अथवा सैन्यदलाचे जवान मदतीसाठी सज्ज असल्याची माहिती देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.