मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरू नका. आंदोलन तीव्र करा, असे प्रल्हाद मोदी म्हणाले.
उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित व्यापाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. उल्हासनगरमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या. या कार्यक्रमा दरम्यान प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे.
प्रल्हाद मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधूच नव्हे, तर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात छोट्या आणि असंघटित व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत येत नाही. अशात ठाणे येथील व्यापाऱ्यांनी आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केले. प्रल्हाद मोदींनी व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
व्यापाऱ्यांशी संवाद साधताना प्रल्हाद मोदी म्हणाले, “व्यापाऱ्यांनी आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहावे, की आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरणार नाही. आम्ही लोकशाहीत जगतो गुलामगिरीत नाही.” आपले आंदोलन आणखी तीव्र करा. मग, मुख्यमंत्री असो की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या दारापर्यंत यावे लागेल.
देशभर लॉकडाउन आणि कोरोना काळात व्यापारी त्रस्त झाले. अशात अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात पेंडॅमिक एक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी दुकाने सील करण्यात आली आहेत. ठाणे येथील कार्यक्रमात उपस्थित व्यापारी प्रतिनिधींनी आपले म्हणणे प्रल्हाद मोदींसमोर मांडले. यावेळी बोलताना महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांवर झालेल्या कारवाया आणि गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रल्हाद मोदी यांनी केली.
ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं. त्यामुळे आम्ही सर्व चायवाले के बेटे आहोत, असं प्रल्हाद मोदी यांनी म्हटलं आहे.