वरणगांव (प्रतिनिधी) वरणगाव येथे आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात वरणगाव बस स्टॅन्डजवळ असलेल्या डॉक्टरांना शनिवारी साडे पाच वाजेच्या सुमारास घेराव घालण्यात आल्याने हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
सुनिल सुरेश कोळी यांचा मुलगा सागर ८ वर्षे याच्यावर गेल्या पाच सहा दिवसा पासून समर्थ हॉस्पिटल या रुग्णालयात निमोनिया, मलेरीया या आजाराचा उपचार सुरु होता. नंतर डॉ. श्री धनके यांनी त्यांना जळगाव गोदावरी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिथे गेल्यावर दुपारी हा मुलगा मरण पावला.
ही घटना डॉक्टरमुळे घडल्याचे जमावाचे म्हणणे होते. त्यानंतर सायंकाळी वरणगाव येथे समर्थ हॉस्पीटल येथे ८ वर्षीय मयत झालेल्या मुलाला आणले होते यावेळी मोठ्या प्रमाणात हॉस्पीटल मध्ये गर्दी झाली होती. संतप्त जमावाने हॉस्पिटल मधे किरकोळ तोडफोड करण्यात आली वरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले व जमावला पांगवले. यावेळी मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी राज कुमार शिंदे, वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि जनार्दन खंडेराव, पी एस आय आय रामदास गागुर्डे, पोलिस सुखराम सावकारे फिरोज पठाण, श्रावण जवरे, प्रशांत ठाकुर, प्रेमचंद सुरवाडे, प्रविण म्हस्के आदी पोलिसांनी जमाव शांत केला होता. परंतु या घटनेमुळे वरणगांव बस स्थानक चौकात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
बालकावर मी उपचार केले व दोन दिवसा पूर्वी त्यांना भुसावळ किंवा जळगाव नेण्याचे सांगितले होते. वेळोवेळी त्यांना वाफ देण्याचा सल्लाही दिला होता. मी योग्य पद्धतीने उपचार केले होते. परंतु दुर्दैवाने त्याला मी वाचवु शकलो नाही यांचे मला फारच दुःख आहे असे डॉ. धनके यांनी सांगितले.