जळगाव (प्रतिनिधी) राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटख्याची मध्यप्रदेशातून पाचोऱ्यात वाहतूक करणारे एक वाहन नशिराबाद टोलनाक्यावर पकडले तर दुसऱ्या वाहनाचा पाठलाग करुन ते तरसोद फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नाकाबंदी करणाऱ्या एसएसटी स्कॉडच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून वाहनांसह सुमारे ३२ लाख ११ हजार ३८० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहन चालकांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करुन एसएसटी स्कॉड पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. नशिराबाद टोलनाक्याजवळ पथक प्रमुख कृशी विभागाचे अधीक्षक निलेश सोनवणे, सल्लाउद्दीनशेख उदबुद्दीन शेख व व्हीडीओग्राफर शहबाजशेख एनोद्दीन शेख व चालक सलिम शेख हे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भुसावळकडून नशिराबादकडे भरधाववेगाने येत असलेले वाहनाला थांबवले. वाहनाची विचारपुस केल्यानंतर वाहनातील सामानाची तपासणी केली असता, त्यामध्ये राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखू मिळून आला.
पथकाने तात्काळ नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि मनोरे यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनांचा पंचनामा करुन ते वाहन नशिराबाद पोलीस ठाण्यात आणले. मध्यप्रदेशातील सागरकुट्टी येथून आणला असून तो घेवून ते पाचोरा जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.
पाठलाग करीत पकडले दुसरे गुटख्याचे वाहन !
गुटख्याचे वाहनावर कारवाई करीत असतांना काही वेळाने (एमएच १९, सीएक्स ०४३०) क्रमांकाचे वाहनही त्याठिकाणाहून पाहून सूसाट वेगाने निघाले. दरम्यान, एसएसटी पथकाने या वाहनाचा पाठलाग करुन ते वाहन तरसोद फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ थांबवले. त्याची तपासणी केल्यानंतर त्या वाहनात देखील गुटखा मिळून आला. दरम्यान, दोन्ही कारवाईमध्ये वाहनातून सुमारे २४ लाख ५७ हजार १८० रुपयांचा गुटखा, ४४ हजार २०० रुपयांची तंबाखू असा एकूण २५ लाख २ हजार ३८० रुपयांचा मुद्देमालासह वाहने जप्त करण्यात आली.