जळगाव (प्रतिनिधी) मध्यरात्री घराला कुलुप लावून कुटुंब बऱ्हाणपूरकडे नातेवाईकांकडे जात असताना चोरट्यांनी घरातील रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा ६६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना शुक्रवारी पहाटे तांबापुरा परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तांबापुरा परिसरातील शेख जब्बार शेख करीम (वय ५५) आणि त्यांचे कुटुंब शालेय पुस्तकांची विक्री तसेच भंगार साहित्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. शेख कुटुंबाला बऱ्हाणपूर येथील नातेवाईकांकडे जाण्याचा निरोप आल्यावर ते गुरुवारी मध्यरात्री घराला कुलुप लावून निघाले. शुक्रवारी, १७ जानेवारीला त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा आणि कुलुप तोडल्याचा प्रकार शेजारधारकांच्या लक्षात आला. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांना घटनास्थळी पाचारण केले.
चोरी झाल्याची माहिती मिळताच शेख यांनी घराकडे धाव घेतली. त्यांच्या घरातून ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. शेख यांनी सांगितले की, घरातील रोकड आणि दागिने ते लग्नासाठी जमवत होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.