जळगाव (प्रतिनिधी) टास्क पूर्ण करण्याच्या नफ्याच्या आमिषाने ४० वर्षीय विवाहितेला ५ लाख २९ हजार ६१६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना ६ ते १४ जानेवारी दरम्यान घडली असून, सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ पुणे येथील रहिवासी असलेली ४० वर्षीय महिला सध्या जळगावातील मनिषा कॉलनी परिसरात राहत आहे. तिला चार जणांनी टेलीग्रामवरील एका ग्रुपमध्ये अॅड केले आणि विविध टास्क पूर्ण करण्याचे सांगून नफ्याचे आकर्षक प्रस्ताव दिले. सुरुवातीला दोन टास्क पूर्ण केल्यानंतर तिला नफा मिळाल्यामुळे महिलेचा विश्वास बसला. मात्र, त्यानंतर त्यांना सांगितले की, टास्क चुकीचे केले आहेत आणि त्यामुळे ‘रिकव्हरी’ म्हणून वेगवेगळ्या कारणांनी रक्कम वसूल केली जाऊ लागली.
६ ते १४ जानेवारी दरम्यान महिला एकूण ५ लाख २९ हजार ६१६ रुपये ऑनलाईन माध्यमातून युपीआय, बँक खाते आणि आरटीजीएसच्या माध्यमातून चोरट्यांना दिले. त्यानंतर, मोबदला मिळवण्याची आशा असतानाही त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही, आणि मुद्दलही परत न मिळाल्यामुळे महिलेने फसवणुकीची तक्रार सायबर पोलिसांकडे केली.
महिलेने टेलीग्रामवर आपला बायोडाटा पोस्ट केलेला होता, आणि सायबर गुन्हेगारांनी तिला संपर्क साधून घरबसल्या काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार टास्क दिले गेले, आणि नंतर महिलेची फसवणूक करण्यात आली. सायबर पोलिस तपास करत आहेत.