मुंबई (प्रतिनिधी) अभिनेता सैफ अली खानवर चाकूचे सपासप वार करणाऱ्या संशयित हल्लेखोराला अखेर छत्तीसगडच्या दुर्ग रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ला झाल्यानंतर ६० तास उलटले तरी आरोपीची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले नव्हते, ज्यामुळे पोलिसांवर टीका होत होती.
सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने त्याच्या घरात घुसून सैफवर वार केले. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही आणि डीव्हीआरच्या मदतीने हल्लेखोराचा माग काढला आणि तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना हल्लेखोर शर्ट बदलून दादर स्थानकावर गेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संशयिताचा फोटो आणि व्हिडीओ इतर राज्यातील रेल्वे पोलीस आणि तपास यंत्रणांना दिला. अखेर, शनिवारी छत्तीसगडच्या दुर्ग स्थानकावर रेल्वे पोलिसांनी संशयित हल्लेखोराला जनरल डब्यातून ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेशमध्ये जात आणखी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याचीही चौकशी सुरू केली आहे.
अशी पकडली आकाशची मानगूट
आरोपी पळून जाताना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याआधारे मिळालेला आरोपीचा फोटो पोलिसांनी सर्व यंत्रणांना रवाना केला होता. त्यानुसार शनिवारी दुपारी दुर्ग येथे रेल्वे पोलीस गाड्यांची तपासणी करत असताना, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या पुढच्या बाजूला जनरल डब्यात विनातिकीट बसलेला आकाश पोलिसांच्या तावडीत सापडला. मुंबई पोलिसांचे एक पथक आकाशला आणण्यासाठी दुर्गकडे रवाना झाले आहे.
सीसीटीव्हीची झाली मोलाची मदत
पोलिसांनी वांद्रे परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सकाळी सातच्या सुमारास तो आढळून आला होता. त्याने हल्ला करतेवेळी घातलेले टीशर्ट आदी कपडे बदलून शर्ट-पॅण्ट असा पोशाख परिधान केला होता. पण त्याच्या पाठीवर असलेल्या बॅगवरून पोलिसांनी त्याला बरोबर हेरले. आरोपीने साडेसात ते आठच्या दरम्यान वांद्रे स्थानकातून लोकल पकडून दादर रेल्वे स्थानक गाठले. सकाळी नऊच्या सुमारास दादर येथील एका मोबाईल दुकानातून त्याने हेडफोन खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.