पालघर (वृत्तसंस्था) भाजप आणि मनसेची युती होणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.