औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. या सभेमुळे शहरातील नागरिक चिंतित झाले असून त्यांच्या भाषणामुळे शहराची शांतता व सुव्यस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज यांच्या सभेला परवानगी देऊ नका, अशी मागणी ‘वंचित’ने केली आहे.
एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेची मनसेकडून जय्यत तयारी सुरु आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान बुक करण्यात आले आहे, तर पोलिसांच्या परवानगीसाठी आजच मनसेचे (MNS) जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांना भेटले. पोलिसांनी अद्याप सभेला परवानगी दिली नसली तरी यावरून आता राजकीय वातावरण तापायला लागले आहे. मनसेचे शिष्टमंडळ सभेला परवानगी मिळावी म्हणून आयुक्तांना अर्ज देऊन येत नाही तोच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेला कुठल्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी आपण आयुक्तांकडे केली असल्याचे वंचितचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. भुईगळ म्हणाले, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेने आधीच राज्यातील वातावरण बिघडले आहे.
मुस्लिम बांधवाचा रमझान सुरू आहे, अशावेळी भोंग्यावरून वाद निर्माण केला जात आहे. शहरातील शांतता या सभेमुळे धोक्यात येऊ शकते. दोन जाती-धर्मांमध्ये तिढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या सभेतून होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून सभेला विरोध करू, असेही भूईगळ म्हणाले.