मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सत्ता बदल झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून शस्त्रक्रिया झाल्याने घरीच विश्रांती घेत होते. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर राज ठाकरेंनी आज पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी माझी तुलना गद्दारांशी करू नका असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंची एक आठवणही सांगितली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्यांना घेऊन बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडांचा उल्लेख करताना राज ठाकरेंचं नावही वारंवार उल्लेखलं जात होतं. त्यावरुन राज ठाकरेंनी तेव्हाच ठणकावून सांगितलं होतं की माझी तुलना गद्दारांशी करू नका. त्याच संदर्भातली एक आठवण राज ठाकरेंनी शेअर केली आहे.
आजवर ही आठवण आपण कोणासोबतही शेअर केली नव्हती, असंही यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल राज ठाकरे बोलले आहेत. राज ठाकरे म्हणाले, मी सेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायला गेलो, शेवटची भेट. त्यावेळी माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते खोलीतून बाहेर गेले. मी आणि बाळासाहेब खोलीत होतो. बाळासाहेबांनी माझ्यासमोर हात पसरले, मला मिठी मारली आणि मला म्हणाले, “जा”. त्यांना समजलं की, मी दगाफटका करुन, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडत नाहीये. आणि दुसऱ्या पक्षातही गेलेलो नाही. तुमच्या सर्वांच्या विश्वासावर मी माझा नवा पक्ष स्थापन केला.
दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर राज ठाकरेंची ही पहिली सभा आहे. राज ठाकरेंच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते विश्रांती घेत होते. राज्यातल्या सत्तांतराच्या खेळामध्ये ते सक्रिय झाले आहेत. आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेच्या पुनर्बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांचे पुत्र अमित ठाकरेही विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत आहेत.