मुंबई (वृत्तसंस्था) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर आज सकाळीच चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा हल्ला चित्रा वाघ यांनी केलाय.
चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजीरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका.अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल”
चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. वाघ यांच्या बोलण्याचा ओघ कोणाकडे यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. राज्यात महिलांच्या प्रश्नांवरून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. चित्रा वाघ यांच्या ट्वीटला चाकणकरांकडून काय प्रत्युत्तर मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.