नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त कोरोनाबाधित सापडले आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत.
देशात आजपर्यंत एकूण १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ कोरोनाबाधित सापडले आहेत. तर त्यापैकी १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटच्या बाबतीत काहीसा दिलासा असला, तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.