मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली आहे. दरवर्षी राज्यशासन, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलिस आणि इतर शासकीय विभाग देखील महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणावर अनुयायांना सेवा-सुविधा देतात. यंदाची स्थिती वेगळी असून त्यात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. चैत्यभूमी ही आपली सर्वांची जबाबदारी असून निर्बंध हे कोरोना रोखण्यासाठी आहेत. सर्व अनुयायी आपापल्या घरुन अभिवादन करतील, अशी ग्वाही या संघटनांनी दिली आहे. दरम्यान चैत्यभूमी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे.