जळगाव (प्रतिनिधी) आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद विनायक बागूल यांच्या ‘कथाशील’ कथासंग्रहातील ‘बाप’ शीर्षकाची कथा गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात बी. ए. भाग एक सत्र दुसरे यासाठी मराठी वाङ्मय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात यापूर्वी एम. ए. मराठी भाग दोनच्या अभ्यासक्रमात त्यांचा ‘संदर्भ माझ्या जातीचे’ हा कवितासंग्रह समाविष्ट होता. या कविता संग्रहातील समता ही कविता स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बीए प्रथम वर्षाच्या महाविद्यालयीन मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यांचा ‘कथाशील’ कथासंग्रह कर्नाटकच्या धारवाड विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे.
‘शंकरराव खरात कथात्म वाङ्मय’ हे वैचारिक पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संदर्भ ग्रंथ म्हणून निवडण्यात आलेले असून, कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय (स्वायत्त) अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश आहे. फ. मुं. गजबजलेलं गाव, हमालपुरा ते कुलगुरू ही त्यांची पुस्तके प्रकाशित असून ‘संदर्भ माझ्या जातीचे’ या कवितासंग्रहावर प्रा. डॉ. के. के. अहिरे यांनी संपादित केलेले ‘संदर्भ माझ्या जातीचे आंबेडकरी जाणिवांच्या कविता’ हे पुस्तक २०१६ मध्ये प्रकाशित झाले आहे.