जळगाव (प्रतिनिधी) येथील कबचौउमवितील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेची संबंधित कर्मचाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.आर. भादलीकर यांनी लेखी स्वरुपात सुयश दुसाणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांना पाठविल्याने भादलीकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आजव्दार सभेत कर्मचाऱ्यांनी केली आहे. ही मागणी विद्यापीठ कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या कृतिसमितीने प्र. कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे लेखी स्वरुपात केलेली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पदनामबदल केलेले शासन निर्णय शासनाने रद्द केल्यामुळे बाधीत कर्मचारी व अधिकारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, त्यामध्ये स्वतः डॉ. एस. आर. भादलीकर हे देखील बाधित आहेत. अशा परिस्थितीत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती आवश्यकता नसतांना व लेखी स्वरुपात कुठलीही मागणी नसतांना विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी सुयश दुसाणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांना लेखीस्वरुपात पाठवली आहे. सदर माहितीचा इतर कामासाठी भविष्यात दुरुपयोग होऊ शकतो व कर्मचाऱ्यांच्या खाजगी माहितीचा भंग होतो. याबाबत आज डॉ. एस. आर. भादलीकर प्र. कुलसचिव, कबचौउमवि, जळगाव यांच्याशी कृतिगटाच्या सदस्यांशी चर्चा झाली असतांना शिक्षण संचालक कार्यालय यांच्याकडील कुठलेही लेखी पत्र नसतांना कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती त्यांच्या परवानगी शिवाय का दिली? याचे समाधानकारक उत्तर डॉ. एस. आर. भादलीकर देवू शकले नाही. डॉ. एस. आर. भादलीकर यांच्याकडे विधी विभागाचादेखील कार्यभार आहे. असे असतांना कर्मचाऱ्यांच्या गोपनीय माहितीचा दुरुपयोग होईल अशा पध्दतीचे वर्तन तसेच माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ८ (१) (जे) चे उल्लंघन झालेले असल्यामुळे त्यांना प्र. कुलसचिव पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याने कृति समितीने लेखी स्वरुपात राजीनामा मागीतलेला आहे. डॉ. एस. आर. भादलीकर हे अनेक प्रकरणे वादग्रस्त कसे होतील किंबहुना त्या न्यायालयात कसे जातील याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबदल तीव्र नाराजीची भूमिका आहे.
सदर राजीनाम्यास मंजुरी द्यावी असा ठराव कृतिगटाने बोलवलेल्या व्दारसभेतही मंजुर करण्यात आला. व्दार सभेत शरद पाटील, भैय्यासाहेब पाटील, दुर्योधन साळुंखे, संजय सपकाळे, महेश पाटील, राजू सोनवणे, विकास बिहाडे, शिवाजी पाटील यांची भाषणे झाली. तसेच सदर डॉ. एस. आर. भादलीकर यांच्या राजीनामा मागणीस उमवि मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनीदेखील पांठींबा दिला आहे.