जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शाहू नगरात झालेल्या ड्रग्स कारवाईचे धागेदोरे हे मास्टर कॉलनीतील शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी याच्यापर्यंत पोहचल्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो दुबई पळून गेल्याचा पोलिसांना संशय होता. परंतू गेल्या मालेगावात ड्रग्सची विक्री करतांना शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी (वय २७, रा. मास्टर कॉलनी, आक्सानगर) पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याला न्यायालयीन कोठडीतून जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शहरातील शाहू नगरात शहर पोलीसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. याप्रकरणी सर्फराज भिस्ती या ड्रग्स माफियाला अटक केली असून त्याची कसून चौकशी केल्यानंतर या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे मास्टर कॉलनीत राहणाऱ्या शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी याच्या पर्यंत पोहचले होते. परंतू अबरारला आपल्या अटकेची कुणकुण लागताच तो जळगावातून पसार झाला होता. परंतू दहा महिन्यांपासून त्याचा जळगाव पोलिसांकडून शोध सुरु असतांना देखील तो पोलीसांना मिळून येत नव्हता. तसेच पोलिसांनी अबरार हा दुबईत पळून गेल्याचे सांगितल्यानंतर हा तपास थंडबस्त्यात पडला होता. परंतू मालेगाव पोलिसांनी चंदनपुरी रस्त्यावरील मन्सूरा कॉलेजवळ ड्रग्स विक्री करणाऱ्यांवर छापा टाकला. यावेळी शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ६ लाख रुपयांचे ६० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
आंतराज्यीय ड्रग्स कनेक्शन होणार उघड
जळगावच्या कारवाईनंतर सुरत व भुसावळ येथे ड्रग्सची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचे कनेक्शन हे मास्टर कॉलनीतील अबरार सोबत असल्याचे उघड झाले होते. त्याच्या शोधार्थ गुजरात पोलीस देखील मास्टर कॉलनीत येवून गेले मात्र त्यांना देखील अबरार हा मिळून येत नव्हता. परंतू त्याला जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने अबरारला नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. चौकशीत अबरारकडून महाराष्ट्र आणि गुजराज राज्यातील ड्रग्स माफियाचे आंतराज्यीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.















