नागपूर (प्रतिनिधी) कळमन्यात पित्याने त्याच्या दारुड्या मुलाला घराबाहेर हाकलून देण्याच्या उद्देशाने धक्का दिला. यात तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाक्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. आकाश गिल्लोर (२४, रा. मिनीमातानगर), असे मृत मुलाचे तर सुखदेव गिल्लोर (५०), असे आरोपी पित्याचे नाव आहे.
कळमना हद्दीतील मिनीमातानगरच्या गल्ली नं. ५ येथे आरती बबलू सूर्यवंशी (२५, रा. विजयनगर, कळमना) हिचे वडील सुखदेव कंगलू गिल्लोर (५०), आई तसेच मोठा भाऊ अशोक सुखदेव गिल्लोर (२७), लहान भाऊ राजहंस (१६) राहतात. अशोक हा ट्रकचालक होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याने महिनाभरापूर्वी आईच्या उपचारासाठी ठेवलेले ४५ हजार रुपये चोरून घरून निघून गेला होता. रविवार, २० ऑगस्ट रोजी आरती सूर्यवंशी आईची प्रकृती पाहण्याकरिता घरी आली होती. रात्री ११ वाजताच्या सुमारास अशोक खूप दारू पिऊन घरी आला. आरतीने त्याला घरात येऊ दिले नाही. २१ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास अशोकने पुन्हा घरी येऊन दार ठोठावले. दार न उघडल्याने त्याने शिवीगाळ केली. आरतीचे वडील सुखदेव गिल्लोर यांनी त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्याने वडिलांसोबत भांडण करून हातबुक्कीने मारहाण केली.
यावेळी सुखदेव यांनी त्याला धक्के देत रोडपर्यंत नेले. अशोक संतुलन बिघडले आणि तो सिमेंट रोडवर पडला. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध झाला. आरती सूर्यवंशी आणि सुखदेव गिल्लोर यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही. आरतीने पोलिसांना सूचना दिली. पोलीस आले असता त्यांना अशोकचा मृत्यू झाल्याचे दिसले. या प्रकरणी आरती बबलू सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी सुखदेव कंगलू गिल्लोर याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.