जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातून १ ऑगस्टपासून सुमारे ३, २६० किलो तूप बेकायदेशीरपणे विक्री झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रविवारी दिवसभर पोलिसांच्या दोन पथकांनी शहरात छापेमारी केली. परंतू त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे कळते.
सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. अधिक पुराव्यांसाठी दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी तुपाची विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे रविवारी पोलिसांनी तूप विक्रीचे पुरावे मिळवण्यासाठी रविवारी दिवसभर छापेमारी केली. अगदी तुपाचे रिकामे डबे शोधण्यासाठी भंगार दुकानांवरही चौकशी केली आहे. दुसरीकडे अटकेतील संशयित पोलिसांनी तपासात सहकार्य करीत नसून समाधानकारक उत्तरे देत नाहीत. त्यामुळेच पुरावे मिळवण्यास पोलिसांना अडचणी येत आहेत. दरम्यान, अटकेतील सहा संशयितांची दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी आज (सोमवार) संपणार आहे. त्यामुळे सर्वांना आज दुपारून पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नेहतेने भरले २ लाख रुपये
जळगाव जिल्हा दूध संघाचे एमडी मनोज लिमये, सी. एम. पाटील यांच्यासह अटकेत असलेल्या सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी मुख्य संशयित निखिल सुरेश नेहते याने अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यासाठी अपहार झालेली सुमारे दोन लाख रुपये रक्कम त्यांनी न्यायालयात जमा केली आहे. इतर सहसंशयितांना न्यायालयीन कोठडी मिळावी यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांनी शनिवारी हा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता.