जळगाव (प्रतिनिधी) माझ्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याची वाटेल ती चौकशी करा. गिरीश महाजन यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली आहे. या टीकेमुळे माझ्यासह पत्नी, सून यांना अश्रू आवरता आले नाहीत. महाजनांच्या वक्तव्यामुळे माझी सून रक्षाताई खडसे यांना मानसिक धक्का बसला आहे. तर माझ्या कुटुंबातील लोकांना दु:ख आणि वेदना सहन कराव्या लागताय, अशा शब्दात असे एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांनी स्व.निखिल खडसे यांच्या मृत्यूविषयी केलेले वक्तव्यामुळे खडसे कुटुंबीयांना दु:खद आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे सध्या खडसे कुटुंबीयांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. एकनाथराव खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली होती की त्याचा खून झाला होता, याचा तपास केला पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. खडसेंच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका. त्यामध्येच खडसे यांचे भले आहे. खरंतर मला याबाबत बोलायचे नाही. पण आपल्या मुलाचं नेमकं काय झालं, याचं उत्तर खडसे यांनी द्यावे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.
याबाबत बोलताना एकनाथराव खडसे यांनी मी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे सांगितले. तसेच माझ्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याची वाटेल ती चौकशी करा. गिरीश महाजन यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली आहे. या टीकेमुळे माझ्यासह पत्नी, सून यांना अश्रू आवरता आले नाहीत. महाजनांच्या वक्तव्यामुळे माझी सून रक्षा खडसे यांना मानसिक धक्का बसला आहे. या प्रकारानंतर माझ्या घरी विचारपूस करण्यासाठी जवळपास ७० फोन आले. गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मात्र, इतके घाणेरडे राजकारण कोणीही केले नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. गिरीश महाजन यांचे हे वक्तव्य आमच्या कुटुंबावर एकप्रकारे संशय घेण्यासारखे आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील लोकांना दु:ख आणि वेदना सहन कराव्या लागत असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
स्व.निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करुन तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निखिल खडसे हे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे पती आहेत. गिरीश महाजन यांनी त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्याच खासदारावर संशय व्यक्त केला आहे का, असा सवाल उपस्थित करत यापुढे एकनाथ खडसेंच्या विरोधात जर बेताल वक्तव्य केलं तर गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्यात फिरू देणार नाही? त्यांचीही आमच्या जवळ अनेक प्रकरण आहेत ती आम्ही बाहेर काढू, असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यातर्फे देण्यात आला.