धरणगाव (प्रतिनिधी) ना. गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री झाल्यापासून धरणगाव येथील बालकवी ठोंबरे स्मारकासाठी स्थानिक पातळीवर व मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौ-याप्रसंगी पाळधी व जळगाव येथील सभेत स्मारकाच्या कामांना गती देण्याचे वचन दिले होते . त्यानुसार बालकवींच्या स्मारकाला ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावच्या एका कार्यक्रमात धरणगाव येथील बालकवी स्मारकाचे ई – भूमिपूजन करण्यात आल्यामुळे धरणगावातील नागरिकांसह साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावारण आहे.
बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला, त्या भूमीत साकारले जाणारे स्मारक गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधीअभावी रखडले होते. ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे धरणगाव साहित्य मंचने बालकवींचे स्मारक पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत होते. त्यानुसार ना. पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला. त्यानंतर या कामासाठी पाच कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. आता दीड कोटींचा निधी देखील वितरीत करण्यात आला आहे. तर जळगावच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते बालकवी स्मारकाचे ई – भूमिपूजन करण्यात आले.
निसर्ग कवी बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे हे स्मारक साहित्यिकांची ‘पंढरी’ म्हणून नावारूपाला येईल, अशी अपेक्षा धरणगाव साहित्य कला मंचने व्यक्त केली आहे. या ठिकाणी विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. स्मारक पूर्ण झाल्यानंतर कवितांची कार्यशाळा, बालकवी साहित्य संशोधन केंद्र, आदी उपक्रम सुरू करण्यासह कोलमडलेला औदुंबर या स्मारकाच्या ठिकाणी नव्याने उभारण्याची संधी असल्याची भावनाही साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.
बालकवींची जन्मभूमी रिसरातला लोकप्रतिनिधी असल्याचा मला सार्थ अभिमान :
धरणगाव हे बालकवींची जन्मभूमी असल्याचा आणि मी या परिसरातला लोकप्रतिनिधी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बालकवींच्या जन्मगावी बालकवीचे स्मारक व्हावे अशी धरणगावरील साहित्यिक प्रेमी आणि आमची प्रखर इच्छा होती. अनेक अडचणी आल्यात मात्र आता ते स्मारक पूर्णत्वाला येईल याचा आनंद आहे. या स्मारकामुळे महाराष्ट्रातील साहित्यिक, कवी यांचे स्वप्नपूर्ती होऊन बालकवींच्या साहित्याच्या अभ्यासाला देखील वाव मिळणार आहे. या स्मारक स्थळी बालकवींच्या साहित्याचा अभ्यास करता येईल, असे ग्रंथालय देखील साकारणार आहोत.
– गुलाबराव पाटील (पालकमंत्री, जळगाव)
ना. गुलाबराव पाटील यांचा धरणगाव पॅटर्न महाराष्ट्रातील सर्व स्मारकांना लागू करणे गरजेचे !
गेल्या एक तपापूर्वी म्हणजे ३० डिसेंबर २०१२ रोजी तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या निधीतून स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन धरणगावच्या साहित्यिकांच्या उपस्थितीत झाले. त्या काळात स्मारकाचे फक्त कंपाऊंड झाले आणि स्मारकाचे काम रखडले. आता धरणगावकरांच्या मागणीमुळे बालकवी स्मारकाचा साहित्यिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे मार्गी लागतो आहे, याचा विशेष आनंद आहे. त्याबद्दल माननीय पालकमंत्र्यांचे बालकवी स्मारकाची मागणी लावून धरणाऱ्या साहित्य कला मंच संस्थेचा संस्थापक तथा साहित्यिक म्हणून आभाराची आणि आदराची भावना व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परवा स्मारकाचे ई भूमिपूजन झाले आणि शासनाचा निधी उपलब्ध झाल्याने स्मारकाच्या निर्मितीचे काम आता पूर्ण अवस्थेकडे जाण्याची खात्री पटली आहे.
महाराष्ट्र ही कवी साहित्यिकांची भूमी आहे. साहित्यिकांची अशी अनेक स्मारके वर्षानुवर्षे अजूनही दुर्लक्षित राहिली आहेत. राजकीय महत्वाकांक्षा अभावी आणि साहित्यिकांच्या उदासिनतेमुळे काही स्मारकांची कामे सुरू आहेत तर काही अपूर्णावस्थेत आहेत. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने अशा अपूर्णावस्थेतील स्मारकांची यादी तयार करून माननीय गुलाबराव पाटील यांच्या राजकीय महत्वाकांक्षेसारखाचा धरणगाव पॅटर्न राबवावा, अशी माझी साहित्याचा अभ्यासक म्हणून मागणी आहे. ही स्मारके केवळ शोभेची न होता ती अभ्यासालये व साहित्य, संस्कृतीची विचारपिठे झाली पाहिजेत. शिवाय या स्मारकांना राजकीय कार्यकर्त्यांना दूर ठेऊन साहित्यिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेतले तर खऱ्या अर्थाने साहित्य चळवळीला बळ मिळेल आणि स्मारकाचे पावित्र्य जपले जाईल. बालकवी ठोंबरे स्मारकापासून ही प्रक्रिया पालकमंत्री साहेब सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.
-डॉ. संजीवकुमार सोनवणे (साहित्यिक, धरणगाव)
स्मारकाचे स्वप्नं साकार होतंय, ना. पाटील हे भव्य-दिव्य स्मारक साकारतील याची आम्हाला खात्री !
बालकवींचा जन्म धरणगावी झालाय. त्या अर्थाने धरणगावात त्यांचे उचित स्मारक व्हावे यासाठी साहित्य कला मंच ३४ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी स्मारकासाठी २ एकर जागा देवून आणि कंपाऊंड वाॅल बांधून त्याची पायाभरणी केली. विद्यमान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील या पायावर कळस उभारण्याचे काम करत आहेत. त्यांनी कोरोना काळानंतर स्मारकाच्या कामाला गती दिली.
तसेच हा प्रश्न सरकारकडे लावून धरला. त्यासाठी ५कोटीची घोषणा केली. आता मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्रींनी या स्मारकाचे ई- भूमीपूजन करुन स्मारक प्रत्यक्षात साकारणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. धरणगावकर आणि साहित्यिकांचा दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. ना. गुलाबराव पाटील हे स्मारकाला भव्य – दिव्य साकारतील याची आम्हाला खात्री आहे. हे स्मारक महाराष्ट्रातील साहित्य प्रेमींसाठी अक्षर-भेट ठरेल. साहित्य कला मंच यासाठी पालकमंत्र्यांचे आभारी आहे.
प्रा.बी.एन.चौधरी :
(अध्यक्ष – साहित्य कला मंच, धरणगाव)