नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगात दिवसेंदिवस नवनव्या आपत्तींना घेऊन वेळोवेळी शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी धक्कादायक इशारा देखील दिला आहे. याच दरम्यान शास्त्रज्ञांनी पृथ्वी लवकर नष्ट होणार असल्याचा दावा केलाय. इतकंच नाही तर, पृथ्वी नष्ट होणार आणि ती कधी नष्ट होणार, याचंही भाकीत त्यांनी केलं आहे. सूर्यामुळे पृथ्वी संपेल, असा दावा करण्यात येत आहे.
सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन आहे. मात्र सूर्यामुळेच ते संपेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. सूर्याचा स्फोट होणार आणि यात संपूर्ण विश्व जळून राख होईल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. सूर्य सध्या तारुण्यात असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जेव्हा स्फोट होईल, तेव्हा आपल्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही. आजपासून ५ अब्ज वर्षांनंतर सूर्याचा स्फोट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे केवळ पृथ्वीच नाही तर सूर्यावर अवलंबून असलेले इतर सर्व ग्रहदेखील नष्ट होतील.
द सनच्या वृत्तानुसार, ५ अब्ज वर्षांनंतर सूर्यामध्ये असलेला हायड्रोजन कोर काम करणं थांबवेल आणि त्यानंतर सूर्य उष्णता निर्माण करू शकणार नाही. यामुळे इतर ग्रहही थंड होतील. सूर्यामुळे नष्ट होणाऱ्या ग्रहांमध्ये बुध आणि शुक्र यांचाही समावेश असणार आहे. पण पृथ्वीवर ज्या प्रमाणात विध्वंस होईल तसा इतर कुठेही होणार नाही, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
सूर्याचा अंत होईल तेव्हा सूर्याच्या शेवटच्या उष्णतेने सर्व महासागर कोरडे होतील. त्या वेळी इतकं कडक ऊन पडेल की प्राण्यांसह माणसांचा जीव जाईल. त्वचा जळण्यास सुरवात होईल. त्यामुळे ही संभाव्य परिस्थिती पाहता मानवी वस्तीसाठी दुसरा ग्रह लवकरात लवकर शोधला पाहिजे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जेणेकरून ५ अब्ज वर्षांनंतर जेव्हा पृथ्वीचा अंत होईल, तेव्हा मानव दुसऱ्या ग्रहावर सुरक्षित असेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पृथ्वीचा अंत कधी होणार हा सातत्याने चघळला जाणारा विषय आहे. यापूर्वीही जगाचा अंत होण्यासंदर्भातील अफवांना सोशल मीडियावर ऊत आला होता. आता नव्याने करण्यात आलेला दावा खरा ठरतो का, हे येणारा काळच सांगेल; मात्र त्याची सत्यता पडताळण्यासाठी आपल्यापैकी कोणीही असणार नाही, हेही तितकंच खरं.