गुहावाटी (वृत्तसंस्था) आसामच्या गुवाहटीसह ईशान्येकडील राज्यांमध्ये आज भूकंपाचे झटके जाणवले. ७ वाजून ५१ मिनटांनी जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिक्टर स्केल वर ६.४ इतकी नोंदवण्यात आली आहे. आसाममधील सोनितपूर भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याचं सांगितलं जात आहे. काही मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्या घराबाहेर धावले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटाला तर त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. ७ वाजून ५५ बसलेला झटका ४.३ रिश्टर स्केल, तर दुसरा ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
आसामला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे. सर्वजण सुखरूप असतील अशी मी प्रार्थना करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावं. सर्व जिल्ह्यांचा आढाव घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सोनवाल यांनी दिली. भाजपाचे आसाममधील नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनीही ट्विट करून भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याची माहिती दिली. शर्मा यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत.