मुंबई (वृत्तसंस्था) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा चुलीवर भाकरी करतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, या व्हिडिओवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत कौर यांच्यासह मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडिओ शेअर करत महागाईमुळेच खासदार नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचं म्हटलंय.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या व्हिडीओमध्ये चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. यामध्ये त्या चपात्या लाटून चुलीवरील भाजत आहेत. हा व्हिडिओ रुपाली चाकणकर यांनी शेअर करत त्याला दिलेल्या कॅप्शनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. रुपाली चाकणकर म्हणतात, गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅसऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!.
या व्हिडीओच्या माध्यमातून काही नेटकऱ्यांनी उज्ज्वला योजना अपयशी झाल्याचीही टीका केली आहे. महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरात सहा कोटींहून अधिक मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र, या कुटुंबांना योजनेतील दुसरा सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्याने असंख्य कुटुंबांनी योजनेकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
ट्विटरवरुन शेअर केला व्हिडिओ
ट्विटरवर नवनीत कौर यांच्या नावाने एक अकाऊंट आहे. ज्या अकाऊंटवरुन त्यांच्या संदर्भातील बातम्या आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते. त्या अकाऊंटवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यासोबतच, कॅप्शनही देण्यात आलं आहे. ‘खासदार नवनीत राणा संसदेच्या अधिवेशनात जनतेचा आवाज उठवत आहेत. तर, शनिवारी व रविवारी अमरावती येथे कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कुटुंबीयांसाठी जेवण बनवत आहेत’, असा आशय या व्हिडिओसह लिहिण्यात आला आहे.