नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं दिल्ली-एनसीआरसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
दिल्ली सरकारनं जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर मोठ्या प्रमाणावर भाजपकडून टीका सुरू होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह लखनऊ, गुरुग्राम, चंदिगड, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्ये छापेमारी सुरू आहे. ईडीचं पथकं दिल्लीतील जोरबागमध्येही पोहोचली आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीनं छापा टाकला आहे. समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे MD आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार, मुळात आज ईडीकडून सीबीआय एफआयआरमध्ये ज्यांची नावे नोंदवली गेली आहेत अशा खासगी व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.