मुंबई (वृत्तसंस्था) पनामा पेपर्स लीक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश आहे. या प्रकरणात बच्चन कुटुंबीयांचे नाव समोर येताच मनी लॉड्रिंगचाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. पनामा पेपर लीक प्रकरणात एका कंपनीचे काही पेपर लीक झाले होते. हा डेटा एका जर्मन न्यूजपेपरने पनामा पेपरच्या नावाने ३ एप्रिल २०१६मध्ये रिलिज केला होता. यामध्ये भारतासहित २०० देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांचा समावेश होता. त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. या यादीमधअये ३०० भारतीयांची नावे आहेत. त्यात बच्चन कुटुंबीतील अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा देखील समावेश असल्याचे म्हटले जाते.
ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट आणि इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून ही माहिती समोर आली आहे. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल ७८ देशातील १०७ पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचे सांगितले जात होते.