मुंबई (वृत्तसंस्था) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या सुपुत्रांच्या घरी व कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला. यावेळी विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश राणे म्हणाले कि, ठाण्यामधील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल मला बरीच माहिती आहे. ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नेते ज्या प्रकारचा कारभार करतात, त्यावरून हा भ्रष्टाचार ठाणेकरांनाही माहिती आहे. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्यात शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदेही आहेत, असेदेखील त्यांनी संगितले.
ईडी ही सरकारची एजन्सी आहे. सरकारची एजन्सी कोणाला तरी काहीतरी वाटते म्हणून ईडी काम करत नाही. त्यांच्याकडे काही माहिती आली असेल किंवा तक्रार आली असेल, म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. जर प्रताप सरनाईक यांनी काही चुकीचे केले नसेल तर त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही, असेही मतही निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली असून सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले आहेत. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. त्यांना अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याचे समजत आहे.