नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Kumar Jain) यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. यामध्ये ईडीच्या हाती कोट्यवधींची रोकड आणि दागिने लागले. अंमलबजावणी संचालनालय (ED) ने तब्बल सात ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत तब्बल २ कोटी ८८ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. त्यासोबतच एकूण १३३ सोन्याची नाणी देखील ईडीनं हस्तगत केली आहेत.
सत्येंद्र जैन आणि सहकाऱ्यांच्या मालमत्तांवरील छापेमारीत ईडीच्या पथकाला मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड सापडली आहे. ईडीने काल, सोमवारी सात ठिकाणांवर छापे मारले होते. त्यात प्रकाश ज्वेलर्सकडे २.२३ कोटींची रोकड मिळाली आहे. वैभव जैन यांच्याकडे ४१.५ लाखांची रोकड आणि १३३ सोन्याची नाणी सापडली आहेत. तर जी.एस. मथारू यांच्याकडे २० लाखांची रोकड मिळाली आहे.
ईडीच्या छापेमारीत घबाड सापडल्यानंतर काही वेळातच आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण ताकदीने आम आदमी पक्षाच्या पाठीमागे लागले आहेत. विशेषतः दिल्ली आणि पंजाब सरकारच्या पाठीमागे लागले आहेत. तुमच्याकडे सर्व यंत्रणांची ताकद आहे. पण आमच्यासोबत परमेश्वर आहे, असं केजरीवाल म्हणाले.
ईडीने सत्येंद्र जैन यांच्याविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांचे निवासस्थान आणि अन्य ठिकाणांवर छापे मारले. तर सत्येंद्र जैन आणि त्यांच्या कंपनीसह अन्य आरोपींशी संबंधित ठिकाणांवर सोमवारी ईडीने छापे मारले. तत्पूर्वी, पीएमएलए अंतर्गत जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ३० मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने ९ जूनपर्यंत त्यांची रवानगी कोठडीत केली आहे.