नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला बुधवारी ईडीने समन्स पाठविले आहे. ईडीने रणबीरला ६ ऑक्टोबर रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
सट्टेबाजी ॲपचे प्रमोशन !
रणबीर महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲपचे प्रमोशन करत होता. यासाठी त्याला रोखीने रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. याशिवाय, ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या दुबईतील लग्नात रणबीरने मनोरंजन केले होते, यासाठी रणबीरला मोठी रक्कम मिळाली होती. हा पैसा मनी लाँडरिंगचा असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याप्रकरणी चौकशीसाठी ईडीने रणबीरला शुक्रवारी छत्तीसगडच्या रायपूर येथील कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला आहे.
५ हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून दुबईला पाठवण्यात आल्याचा ईडीला संशय !
मूळचे छत्तीसगडच्या भिलाईचे असलेल्या सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी महादेव ॲप ही कंपनी दुबईत स्थापन केली. हे अॅप पोकर, कार्ड गेम, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धा सुरू असताना अवैध सट्टेबाजीसाठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. भारतात ३० टक्के कमिशनच्या आधारावर कंपनीच्या शाखा उघडण्यात आल्या. लाखो लोक या अॅपचा वापर करत होते. अॅपच्या वॉलेटमध्ये टाकलेला पैसा सौरभ व रवीने हवालाच्या माध्यमातून इतरत्र फिरवला. सुमारे ५ हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून दुबईला पाठवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.
अन्य बॉलीवूड सेलिब्रेटींना कशीसाठी बोलावले जाऊ शकते !
याप्रकरणी बॉलीवूडमधील काही अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये टायगर श्रॉफ, नुसरत भरुचा, सुखविंदर सिंग, नेहा कक्कड, सनी लियोनी, आतिफ अस्लम, राहत फतेह अली, अली असगर, विशाल ददलानी, भारती सिंग, कृती खरबंदा, भाग्यश्री कृष्णा अभिषेक, एली अबराम यांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या कलाकारांनी सौरभ चंद्राकरच्या लग्नात कलाविष्कार सादर केले होते. त्यासाठी त्यांना देण्यात आलेला पैसा मनी लाँडरिंगचा असून ईडीकडून त्यांनाही लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.