मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. यापूर्वी देखील अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र नियोजित कार्यक्रमांमुळे ते हजर राहू शकले नाहीत.
मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ही समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने सचिन वाझे याचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की पोलीस दल आणि परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये २० कोटी रुपये अनिल परब यांनी घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाचे अधिकारी आणि परब यांच्या जवळचे मानले जाणारे बजरंग खरमाटे यांचीही चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता परब यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.
३१ ऑगस्ट रोजी परब यांना पहिलं समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे त्यांनी ईडीकडे १४ दिवसांची मुदत मागितली होती. ती तेव्हा ईडीने मान्यही केली होती.