जळगाव (प्रतिनिधी) प्रगती विद्यामंदिर शाळेत एआयचा वापर करून शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती या विषयावर अभिनव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मार्गदर्शन शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांनी केले. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
विशेषतः शाळेच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी मराठी विषयाच्या व्याकरणाचा संपूर्ण भाग एआयच्या मदतीने तयार करून त्याचे शैक्षणिक व्हिडिओ बनविले. या अभिनव प्रयोगाचे सर्व शिक्षक व उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या सृजनशील कार्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचेही पाहायला मिळाले.
या कार्यशाळेत विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गोहील यांनी सहभाग घेतला व आपली मते व्यक्त केली.
चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी एआयमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नवे आयाम मिळतील असे सांगितले. अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी अशा कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळते असे नमूद केले. सचिव सचिन दुनाखे यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शिक्षण अधिक सोपे व आकर्षक बनते असे सांगितले. तर मुख्याध्यापिका संगीता गोहील यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले शैक्षणिक व्हिडिओ हे एक आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले.
या उपक्रमाला उपस्थित पालकांनीही भरभरून दाद दिली. विद्यार्थ्यांनी एआयच्या साहाय्याने मराठी व्याकरणाचे व्हिडिओ तयार केले ही बाब अभिमानास्पद असून, भविष्यातील तंत्रज्ञानाशी त्यांचा परिचय करून देणारी आहे, असे पालकांनी नमूद केले.
कार्यशाळेत शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
















