जळगाव (प्रतिनिधी) केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ‘आश्रय माझे घर’ या प्रकल्पाच्या माध्यमातून मतीमंद बालकांचे संगोपन करण्याचे महत्वाचे काम होत असून या बालकांना आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावे अशी अपेक्षा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा नियोजनमधून या परिसरासाठी ट्रान्सफार्मर व ओपन जीमसह रोटरीच्या सोलर प्रणालीच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.
केशवस्मृती प्रतिष्ठान संचलीत मातोश्री वृध्दाश्रम परिसरात ‘आश्रय माझे घर’ या प्रकल्पात मतीमंद विद्यार्थ्यांच्या संगोपनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर व ओपन जीमची आवश्यकता असल्याची मागणी प्रतिष्ठानतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी यासाठी निधीची तातडीने तरतूद केली. या अनुषंगाने रविवारी सकाळी ट्रान्सफार्मर व ओपन जीमचे लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात रोटरीतर्फे सोलार प्रणालीचा लोकार्पण सोहळा देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘आश्रय माझे घर’च्या माध्यमातून मतीमंत मुलांचे संगोपन हे अतिशय उत्कृष्ट पध्दतीत होत आहे. मात्र सद्यस्थितीतील नियमानुसार वयाच्या अठरा वर्षापर्यंतच त्यांचे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संगोपन करता येते. ही मुदत वाढून त्यांना खर्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. पालकमंत्र्यांनी याप्रसंगी कोविडच्या काळात अविरतपणे सेवा करणार्या डॉक्टर मंडळीचे कौतुक केले. तर मातोश्री वृध्दाश्रमासह केशवस्मृती प्रतिष्ठानच्या विविध संस्थांच्या कामांची पालकमंत्र्यांनी स्तुती केली. याप्रसंगी मातोश्री वृध्दाश्रमासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी दोन लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली. समाजातील मान्यवरांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले.
आईच्या नावाने दोन लाखाची देणगी जाहीर
आपल्या आईंच्या नावाने त्यांनी आश्रयला दोन लाख एक रुपयांची मदत घोषित करून आपण केवळ बोलत नाही तर कृतिशीलही आहोत हे दाखवत त्याचा प्रत्ययही आणून दिला.
मातोश्री आनंदाश्रम येथे ओपन जिम साहित्य व ट्रान्सफार्मरचे लोकार्पण
मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथे जिल्हा नियोजन व विकास निधीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रु. १० लक्ष किमतीचे ओपन जिम साहित्य मातोश्री आनंदाश्रमातील वृद्धांसाठी मंजूर केले होते. तसेच ७ लक्ष निधीतून स्वतंत्र ट्रान्स्फार्मर मंजुर केले होते. या प्रसंगी ओपन जिम व ट्रान्स्फार्मर चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्री फळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
या सेवाव्रती चा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार
“आश्रय माझे घर ” ला सातत्याने निस्वार्थ वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुशिल गुजर, डॉ. राहुल महाजन, डॉ. निलम महाजन, डॉ महेश बिर्ला व त्यांचे सहकारी यांचा गौरव करण्यात आला. कोरोना काळात विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. रितेश पाटील व सेवारथ परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अंबळकर,डॉ.प्रतापराव जाधव, उद्योगपती सुशील असोपा, भावेश शहा, संजय शहा, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत, प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया व सर्व संचालक, रोटरी क्लबच्या माजी गवर्नर अपर्णा मकासरे, हितेश मोतीरामानी, आश्रय माझे घर चे सर्व सदस्य यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रताप जाधव, आभार प्रदर्शन रेखा पाटील यांनी तर सूत्रसंचालन संगिता अट्रावलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आश्रय माझे घर, मातोश्री आनंदाश्रम, विवेकानंद प्रतिष्ठान निवासी शाळाच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.