जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूकीत भाग का घेतल्याच्या संशयावरून तरूणासह त्याच्या कुटुंबियाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली होती. ही घटना लमांजन येथे घडली. याप्रकरणी आठ संशयितांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, लमांजन (ता. जळगाव) येथील सुनिल प्रभाकर पाटील हा मुंबईला नोकरी करतो. मतदानासाठी तो, गावी आला होता. रविवार (ता. ३१ जानेवारी) रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गावातील योगेश भास्कर पाटील हा ग्रामपंचापंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सुनिल पाटील याला घेवून गेला होता. थोड्यावेळाने सुनील घरी परतला. त्याच्या पाठोपाठा गावातील बापु परबत पाटील, गोरख निंबा पाटील, भागवत रामदास पाटील, विठ्ठल वाल्मीक पाटील, पिंटू रामलाल पाटील, आबा निंबा पाटील, भिका भगवान पाटील आणि योगेश भास्कर पाटील अशांनी सुनीलच्या घरी येत तू निवडणुकांत भाग का घेतला असे म्हणत हल्ला चढवुन बेदम मारहाण केली. मुलास मारहाण होत असल्याने सुनिलची आई मंगलाबाई पाटील मध्यस्थी केल्याने बापु पाटील याने त्यांना जोरदार धक्कादेत फेकुन दिले. यावेळी झटापटीत त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तुटून कोठेतरी पडली. यात सुनिल पाटील हा गंभीर जखमी झाला असून जखमीच्या जबाबावरुन आठ संशयीतांच्या विरुद्ध एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.