चाळीसगाव (प्रतिनिधी) एक आक्रमक युवानेता म्हणून ओळख तयार झालेल्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांना एक हळवे मनही आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. नुकताच अशाच एका प्रसंगाने अनेकांचे डोळे पाणावले. तालुक्यातील आडगाव येथील पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात शिवनेरी फाउंडेशनची स्नेहाची शिदोरी घरपोच पोहोचवण्यात आली. यासाठी आमदार मंगेशदादा व प्रतिभाताई चव्हाण यांनी मदतीचा हात दिला.
वडिलांचे आजारपणामुळे अकाली निधन
आडगाव येथील गरीब शेतमजूर कै.बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अकाली निधन झाले होते. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणाऱ्या कै. बापू यांची लहान मुलगी कु.दुर्गा हिचे लग्न दि.२ मे रोजी ठरले असून ऐन लग्नाच्या महिनाभर अगोदर हा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. कै. बापूंच्या उपचारासाठी देखील मोठा खर्च लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्न कसे पार पाडावे?, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
वऱ्हाडी लोकांच्या जेवणाचा किराणा पोहचवला घरपोच !
गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई मंगेशदादा चव्हाण यांना कळाली असता त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने कु.दुर्गाच्या लग्नातील एक हजार वऱ्हाडी लोकांच्या जेवणाचा किराणा बाजार घरपोच सुपूर्द करण्यात आला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
प्रसिद्धीसाठी नव्हे हृदयापासून मदत !
पतीचे निधनाचे दुःख व तोंडावर आलेले मुलीचे लग्न या विवंचनेत असलेल्या त्या मायमाऊली या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. यामुळे आमदार मंगेशदादा व प्रतिभाताई चव्हाण यांच्या दातृत्वाचे मोठे कौतुक होत असून दादा आणि ताई नेहमीच तालुक्यातील संकटात अडल्या नडल्या निराधारांच्या पाठीमागे उभे राहतात. एवढेच नव्हे तर मदत केल्यानंतरही कधी प्रसिद्धीसाठी समोर येत नसल्याचा भावना देखील अनेकांनी बोलून दाखवल्या.