मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केला जाणार होता, असा धक्कादायक आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करत असल्याचेही ते म्हणाले. गायकवाड यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संजय गायकवाड यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, एकनाथ शिंदेंना दुसरं काही देणार नव्हते त्यांना मौत देणार होते. मौत. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचा एन्काऊंटर करणार होते. म्हणून त्यांचं संरक्षण काढलं होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. अगदी मी मोठ्या जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे, असा दावा देखील संजय गायकवाड यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शंभुराजे देसाई गृहमंत्री होते. त्यांच्या घरी बैठक सुरू होती. मातोश्रीवरून फोन आला. त्यांना सुरक्षा देऊ नका. याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपलेले होते असंच ना? शिंदे राजकारणातून खतम होत नाही म्हणून त्यांना नक्षल्यांच्या हातून मारणार होते. म्हणून तुम्ही त्यांना सेक्युरीटी नाकारली, असा दावाच गायकवाड यांनी केला आहे.