जळगाव (प्रतिनिधी) खानदेशमधून मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुली केल्या जात प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसेंनी सभागृहात पेनड्राइव्ह सादर केला आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील माफियांची रेकॉर्डिंगही अध्यक्षांना दिली आहे. या रेकॉर्डींगमध्ये तहसीलदारांना धमकीसह महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद असल्याचेही खडसे यांनी सभागृहात सांगितले. खडसे यांनी वक्फ बोर्ड जमीन, रोहिणीताई खडसेंवरील हल्ल्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह सरकारला धारेवर धरले. पहा याचा संपूर्ण व्हिडीओ !
एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर डिसेंबर 2021 मध्ये काही अज्ञातांनी हल्ला केला होता. हा हल्ला करण्यामागे शिवसेनेच कार्यकर्ते असल्याचा आरोप केला. रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याचा तपासाचा मुद्दा एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. एकनाथ खडसे यांनी म्हटले की, रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आतपर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही चौकशी IPS अधिकाऱ्याकडे सोपवली होती. मात्र, पोलिसांनी उलट आरोपींना सहकार्य केलं असल्याचा आरोप खडसे यांनी केला. भादंवि 307 नुसार गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचे खडसे यांनी सांगितले.
रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तडिपार करण्याची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसा रद्द करण्यात आल्या आहेत. एका महिलेवर हल्ला होतो आणि आरोपींना संरक्षण दिले जाते यापेक्षा दुसरं दुर्देव कोणते, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. अशा गुंडाना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी असा सवालही त्यांनी केला. आपल्या आरोपांबाबतचा व्हिडिओ आणि ॲाडिओ क्लिपचा पेन ड्राईव्ह एकनाथ खडसे यांनी सभागृहात सादर केला. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण लिखीत उत्तर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
जाणून घ्या… ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडले होते.
रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली. तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले. एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आले होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला होता.