मुंबई (वृत्तसंस्था) भाजपमधील माझ्या मित्रांनी मतदान केल्याने अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी माझा विजय झाला. राष्ट्रवादीने दिलेल्या संधीचं मी सोनं करेन. भाजपमध्ये माझा छळ झाला. त्यावेळी मला राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं. पण आता मला बोलायला व्यासपीठ आहे आणि संधीही आहे”, अशी विजयी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी एकप्रकारे भाजपला इशारा दिला. यावेळी खडसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीकडं फक्त ५१ मतं होते तरी आम्हाला ५८ मते मिळाली ज्यापैकी २९ मते मला मिळाली असे खडसे यांनी सांगितले.जी काही मते मिळाली असतील ते मला भाजपमधल्या मित्रांनी दिले असावेत असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील या नेत्यांनी मला संधी दिली या संधीचं मी सोनं करेल, पुर्वीपेक्षा बोलायला अधीक संधी आणि वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.
खडसेंनी वाचला सहा वर्षाच्या छळाचा पाढा
राष्ट्रवादीचे नवनियुक्त आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, “भाजपमधील मित्रांनी मला अतिरिक्त मदत दिली. गेल्या सहा वर्षात खूप छळवणूक झाली. ईडी वगैरे तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावला. मंत्रिपदावर असताना खोटे आरोप करुन राजीनामा घेतला. आरोप खोटे ठरले, झोटिंग अहवाल आला, तिथेही काही नाही मिळालं. ईडी चौकशी झाली, जावयाला अटक करण्यात आली. बायको, मुलींना समज देण्यात आली. प्रॉपर्टी सीज झाली. तीन आठवड्यापूर्वी आदेश आला, माझी राहती घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले. मला बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.”
ईडी-सीडीचा विषय योग्य वेळी काढणार
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, “माझ्या सर्व खात्यातील सर्व पैसे काढले, एकूण एक पैसा काढून घेतला. अजून छळ थांबलेला नाही. राजकारणातून मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना असताना राष्ट्रवादीने पुनर्वसन केलं. ईडी-सीडीचा विषय योग्य वेळी काढेन, विधानपरिषदेत अनेक विषय मांडणार. राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी मदत करणार आहे.”