मुंबई (वृत्तसंस्था) सोनू सूदला पंजाबच्या निवडणूक आयोगाने “स्टेट आयकॉन’म्हणून घोषित केले आहे. पंजाबच्या निवडणूक आयोगाच्या ट्विटर हॅन्ड्लवर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात केलेल्या मदतीमुळे सोनू सूद सर्वाधिक चर्चेत राहीला होता. यात आता सोनू सुदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
“पंजाबच्या नागरिकांसाठीचा खराखुरा हिरो आता राज्याच्या निवडणूक आयोगाचा स्टेट आयकॉन देखील असणार आहे.’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. सोनू सूद गेल्या सहा महिन्यांपासून त्याने केलेल्या समाजसेवेच्या कामामुळे सतत चर्चेत असतो. लॉकडाऊनच्या काळात त्याने प्रवासी मजूरांच्या प्रवासासाठी स्वतःच्या खर्चाने वाहनांची व्यवस्था केली होती. याशिवाय त्याने शेकडो मजूरांच्या जेवणाचीही व्यव्स्था केली होती. याबद्दल त्याचे सर्वच स्तरांमधून कौतुक झाले होते. आता सोनू सूदने स्वतःचे आत्मचरित्रदेखील लिहायला घेतले आहे. त्यामध्ये तो करोनाची साथ, लॉकडाऊन आणि त्या काळात त्याला आलेले अनुभव लिहीणार आहे.
दरम्यान, या सन्मानासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानतो. सर्वांचे आभार! माझा जन्म पंजाबमध्ये झाल्यामुळे ही गोष्ट भावनिकदृष्ट्या खूप अर्थपूर्ण आहे. माझ्या राज्याला माझा अभिमान आहे, याचा मला आनंद आहे. यातून मला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे’, असे सोनू सूद म्हणाला.