पुणे (वृत्तसंस्था) “निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाची उपशाखा आहे. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही,’ अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केली. बिहार निवडणुकीत करोना लस मोफत देण्याच्या घोषणेत भाजपला “क्लीनचिट’ देण्यात आली. त्या संदर्भात प्रश्नाला ते उत्तर देत होते. त्याचवेळी “बिहारमध्ये तेजस्वी यादव सत्तेवर येतील,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात राऊत यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती ही घटनात्मक पदे आहेत. त्यांच्याबाबत बोलताना त्या पदांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. आम्ही तो ठेवला होता. कठोर टीका केली. मात्र, त्या पदाचा अवमान कधी केला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील टीकाकारांचा सन्मान करत असत. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या नेत्यांची भूमिकाही तीच होती. मात्र, आता ती परिस्थिती बदलत आहे.’ “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची स्थिती उत्तमरित्या हाताळली. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढले. अन्यत्र हे दिसत नाही.
अर्णब गोस्वामींचे समर्थन नको
“आम्ही टीका करताना पदांचा अवमान केला नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या टीकेचे समर्थन होऊ शकत नाही. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. कंगना राणावत यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्या संशयित आरोपी आहे. त्या आता मुंबईत का येत नाहीत, याची आम्हाला कल्पना नाही. त्यांचे समर्थकही सध्या सोशल मीडियावर दिसत नाहीत,’ असे राऊत म्हणाले.
दोन किंवा अधिक पक्षाचे सरकार असताना ज्येष्ठ नेत्याचा सल्ला घेतला जातो. युतीच्या राजवटीत शिवसेनाप्रमुखांचा सल्ला घेतला जात असे. आता आम्ही शरद पवार यांचा सल्ला घेतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्ही घेतला नाही, तर आमच्यासारखे करंटे आम्हीच, असे ही राऊत म्हणाले आहेत.