नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी व्यक्त केला.
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत मोठी व महत्वाची टिप्पणी केली आहे. देश कोरोनाशी लढा देत असताना राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. एका सुनावणीवेळी मद्रास उच्च न्यायालायने, राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. असं म्हणत निवडणूक आयोगाला फटकारलं आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसंभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून असल्याने न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे.
दरम्यान, येत्या २ मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर मतमोजणी थांबवू, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. ३० एप्रिलपर्यंत मतमोजणीसाठी कोविड प्रोटोकॉलबाबत काय उपाययोजना करणार आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
तसेच लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. संवैधानिक पदांवरील लोकांना अशा गोष्टींचं स्मरण करुन द्यावं लागतं हे दुर्देव आहे. जेव्हा एखादा व्यक्ती जिवंत असेल तरच तो त्याच्या लोकशाही अधिकारचा लाभ उठवू शकेल ना? असा संतप्त सवालही कोर्टाने केला आहे.