जळगाव (प्रतिनिधी) : घराच्या कंपाऊंडमध्ये चार्जिंगला लावलेल्या दोन इलेक्ट्रीक बाईकला आग लागून त्या जळून खाक झाल्या. तसेच आगीमुळे घरातील एअर कंडीशनचे आऊट डोअर जळून काँम्प्रेसरचा स्फोट झाला. ही घटना रविवारी पहाटे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या मागे बालाणी रिसॉर्टजवळ एका बंगल्यामध्ये घडली. अग्निशमन विभागाच्या बंबाने या आगीवर नियंत्रण मिळवले.
शहरातील एमआयडीसी परिसरातील रहिवासी अंकुश कदम व त्यांचे कुटुंबीय घरात वरील मजल्यावर झोपलेले होते. यावेळी घराच्या कंपाऊंडमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकने अचानक पेट घेतला. तिच्या शेजारीच असलेली दुसरी इलेक्ट्रीक बाईकही जळाली. आगीचे लोट उंच जात असल्याने भिंतीवर असलेल्या एसीच्या आऊट डोअरनेही पेट घेतला. काही क्षणातच त्यातील कांम्प्रेसरचाही स्फोट झाला. पाठोपाठ आतील एसीलाही झळ बसली. या आगीत खिडकीच्या काचा फुटल्या व आतमध्ये असलेले दिवाण व गादीही जळाली.
रहिवाशांनी केले आग विझविण्याचे प्रयत्न
बाईकला आग लागली त्या वेळी घरासमोरील अपार्टमेंटमधील रहिवशांनी कदम कुटुंबीयास माहिती दिली, त्या वेळी ते खाली आले. रहिवाशांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला व अग्नीशमन विभागाला माहिती दिली. अग्नीशमन विभागाचे प्रकाश कुमावत, नितीन ससाणे, शिवाजी तायडे, ऋषभसुरवाडे यांनी आग विझविली.
















