जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी विभागातील वीज कंपनीचे अभियंता पाचंगे यांच्या नावाने दहा हजारांची लाच मागणी करणार्या खाजगी इसमाविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. अनिल सुधाकर सासनिक (35, रा.प्लॉट नं.7, श्रद्धा कॉलनी, महाबळ, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या खाजगी इसमाचे नाव आहे.
एमआयडीसीत भाड्याच्या शेडमध्ये कार रिपेअरिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला जादा येणारे वीज बिल कमी करण्यासाठी व मीटरचा लाेड कमी करण्यासाठी अनिल नावाच्या व्यक्तीचा फाेन नंबर देत भेटण्याचा सल्ला महावितरणच्या उपअभियंत्याने दिला. त्यालाच अभियंत्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन विभागाने सापळा रचून अटक केली आहे.
एमआयडीसीत तक्रारदार याचा कार रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. ते वीज बिल जास्त येत असल्याची तक्रार करायला महावितरण कार्यालयात उपअभियंता सुरेश पाचंगे यांच्याकडे गेले असता त्यांनी लाेड कमी करण्यासाठी अनिल नावाच्या खासगी इसमाचा फाेन नंबर देऊन त्याला भेटा, ताे प्राेसिजर सांगेल असे सांगितले. तक्रारदार यांनी अनिल सुधाकर सासनिक (वय ३५, रा. श्रद्धा काॅलनी) याची भेट घेतली असता. लाेड कमी करण्यासाठी अभियंता पाचंगे यांच्या नावाने १० हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडून केली. ही लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पाेलिस निरीक्षक एस. के. बच्छाव, एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील व पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, लाच घेणारा हा अनिल सासनिक हा अभियंताचा जवळचा नातेवाईक असल्याचे सूत्रांकडून समजते.