एरंडोल (प्रतिनिधी) प्लॉट विक्रीसह व कौटुंबिक वादातून मुलासह त्याच्या पत्नीने वृद्धेचे डोके दगडावर आपटून हत्या केली. ही दुर्देवी घटना एरंडोल तालुक्यातील केवडीपुरा भागात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. विमलबाई रोहीदास मोहीते (बेलदार) (वय ६०) असे मयत वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
डोके दगडावर आपटून केला निर्घृण खून !
एरंडोल शहरातील केवडीपुरा भागात विमलबाई मोहीते या वास्तव्या होत्या. त्यांच्या घराशेजारी असलेली जागा विमलबाई यांच्या नावावर होती. ती जागा विकरण्यासाठी विमलबाई यांचा मुलगा बापू मोहीते व त्याची पत्नी शिवराबाई मोहीते हे वृद्धेला त्रास देत होते. तसेच त्यांच्याकडून वृद्ध महिलेला मारहाण देखील होत असल्याने वृद्धा विमलबाई या काही दिवस धरणगावात आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र समासजातील काही प्रतिष्ठीत लोकांनी विमलबाई यांच्या मुलासह त्याच्या पत्नीची समजूत काढल्यानंतर त्या पुन्हा मुलाकडे राहण्यास आल्या होत्या. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दाम्पत्याने वृद्ध विमलबाई यांचे डोके दगडावर आपटून त्यांचा निर्घृण खून केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून करणाऱ्या मुलासह त्याच्या पत्नीला अटक !
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित वृद्ध महिलेचा मुलगा संशयित बापू रोहिदास मोहिते (बेलदार) (वय ४०) व त्याची पत्नी शिवराबाई बापू मोहिते (वय ३५) या दोघांना अटक केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सतिश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्यात वापरलेला दगड हस्तगत केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतिश गोराडे हे करित आहेत.