अमळनेर (प्रतिनिधी) सुमारे पाच हजारांच्यावर अमळनेर मधील नागरिक पुण्यात स्थायिक झाले आहेत. अमळनेर तालुक्यातून पुण्यात स्थायिक झालेल्या सर्वांना एकत्रित करण्यासाठी ‘अमळनेर मित्रपरिवार’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार छाजेड यांनी दिली आहे.
दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिक्षणासाठी मुले, मुली पुणे शहरात येतात.अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया, हॉस्टेल, जेवणाची सुविधा, एज्युकेशन लोन, शैक्षणिक दाखले इ. कामात अमळनेर मित्र परिवार ही संस्था मदत करणार आहे. मुलींसाठी लवकरच हॉस्टेल उभारले जाणार आहे. तर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासुन वंचित राहणाऱ्या काही मुलींचे पालकत्व ही संस्था स्वीकारणार आहे. अमळनेर तालुक्यातुन चांगले प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत, यासाठी अमळनेर व पुणे दोन्ही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. पुण्यातील दर्जेदार शिक्षण संस्थेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. संस्थेच्या कार्यात पुण्यातुन मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत आहे. अमळनेरच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू असे प्रा.विकास मटकरी, राजेश पांडे,राधेश्याम अग्रवाल, प्रा.अशोक पगारिया, राजकुमार छाजेड, राजेंद्र भामरे, भैरवी वाघ-पलांडे यांनी म्हटले आहे.
पुण्यात स्थायिक झालेल्या हजारो अमळनेर करांना एका छताखाली एकत्रित करण्यासाठी अमळनेर मित्र परिवार लवकरच कार्यक्रम घेणार आहे. संस्थेने पुण्यात वास्तव्यास असलेल्या सर्व अमळनेर करांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे. शैक्षणिक सहकार्यासोबतच वैद्यकीय मदत देखील संस्थेमार्फत करण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आज पुण्यात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सर्वच अधिकाऱ्यांनी या कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या उपक्रमासाठी लवकरच अमळनेर येथे मेळावा घेण्यात येणार असून, या संस्थेच्या माहितीसाठी 9851518899 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील पुणे येथे स्थायिक झालेल्या विद्यार्थी, लग्न झालेल्या मुली, नोकरदार व व्यावसायिक यांची माहिती त्यांचे संपर्क क्रमांक पाठविल्यास,त्यांच्याशी संपर्क साधता येईल असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.