अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी वॉररूमची स्थापना केली आहे. कोरोनाशी संबंधित तक्रारींसाठी व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सध्या राज्यात व देशात कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत महाशय जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याकामी अधिकारी, डॉक्टर्स यांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे व समन्वय राखणे याकरिता तसेच रुग्णांना आवश्यकतेप्रमाणे बेडस उपलब्ध करून देणे, औषध पुरवठा करणे, शहरात सुरू असलेल्या अँटीजेन कॅम्पची माहिती मिळणे, वैद्यकीय साहाय्यक यांची नियुक्ती करणे. जेणेकरून दाखल होणाऱ्या रुग्णांना आवश्यक सर्व सोयी तत्काळ उपलब्ध होतील, असे मत प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी व्यक्त केले
तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून नगर परिषद अमळनेर येथे वॉररूमची स्थापना करण्यात येत असून बेड मॅनेजमेंटसाठी आर डी महाजन (गट शिक्षणाधिकारी अमळनेर) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. औषध पुरवठा बाबत जबाबदारी महेश जोशी (औषध निर्माता न.प.अमळनेर), अँटीजन कॅम्पची जबाबदारी संजय चौधरी (प्रशासनाधिकारी न.प.अमळनेर), ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यक म्हणून गिरीष गोसावी तर शहरी भागातील रुग्णांकरिता राजेंद्र शेलकर (वैद्यकीय अधिकारी नगर परिषद अमळनेर) याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता १८६०(४५)चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५३ ते ६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.