मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचं उघड झालं आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतरही घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. या दोघांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पुण्यातील एका नर्सला कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. ही घटना ताजी असतानाच आता घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून कोरोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोन्ही पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.
दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात ६ हजारावर नवीन करोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर लसीकरणानंतरही करोनाची लागण होत असल्याची बातमी काळजी वाढवणारी ठरली आहे.
कोरोनातून बरे झाल्यावरही कोरोना
राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांना यापूर्वी कोरोनाची लक्ष जाणवली होती. त्यावर त्यांनी उपचारही घेतले होते. तसेच नागपूरमध्ये पाच डॉक्टरांना उपचारानंतर पुन्हा कोरोना झाला आहे.
















