मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील घरावरील हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून सर्व काही केलं ते सदावर्तेंनी केलं अशी कबुली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली आहे.
या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपल्याला न्यायाधीशांशी बोलायचं आहे अशी विनंती केली होती, आम्हाला न्यायालयाला (म्हणजेच न्यायाधीशांना) काही सांगायचे आहे असं ते म्हणत होते. या प्रकरणात आमचा काही रोल नाही. आम्ही आरोपी नाही, सगळं सदावर्ते यांनी केलंय असं अभिषेक पाटील म्हणाला. तर तशाच प्रकारची कबुली चंद्रकांत सुर्यवंशी यांने दिली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागलं आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकवण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाकडे मोर्चा वळवला. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.