भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी आमदार चौधरी यांनी या संदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत चर्चादेखील केली असून शनिवारी दिवसभरात उमेदवारीबाबत घोषणा होईल, अशी शक्यता आहे.
आज उमेदवारी जाहीर होणार !
रावेर लोकसभेसाठी खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा भाजपाने संधी दिल्यानंतर मविआकडून मात्र या जागेवर अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही. आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे नकार दिला तर दुसरीकडे राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी नाशिकच्या बैठकीत अॅड.रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करीत त्यांना उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला. मात्र, अॅड.रोहिणी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार देत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता मविआकडून तुल्यबळ उमेदवाराला संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी किंवा अॅड.रवींद्र पाटील यांच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांच्या सुनेला उमेदवारी देऊन भाजपाने रावेर मतदारसंघात मविआसमोर पेच निर्माण केला आहे. आता भाजपविरोधात लढायचे की ती जागा कमी क्षमतेचा उमेदवार देऊन सोडायची या द्विधा मनस्थितीत शरद पवार गट असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र कुठल्याही परीस्थितीत ही जागा हातून न जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत.