चोपडा (प्रतिनिधी) चोपड्यात भरदिवसा १५ लाखांची चोरी झाल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. बँकेतून काढलेल्या १५ लाख रुपये असलेली कापडी पिशवी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लुटून पलायन केले.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील लक्ष्मी जिनिंग अँड प्रेसिंगचे मालक मनोज हरसाय अग्रवाल यांचे कर्मचारी संजय शिवदास पालिवाल (५२, रा महालक्ष्मी नगर चोपडा) हे आज बस स्टँड जवळील आडगाव, गोरगावले रिक्षा स्टाफ जवळ असलेल्या आय डी बी आय बँकेच्या शाखेत १५ लाख काढण्यासाठी बँकेत गेले होते. बँकेतून पैसे काढल्यानंतर कापडी पिशवीत सदर रकमेची पिशवी सोबत घेऊन खाली उतरले. यावेळी संजय पालिवाल हे एम एच सी इ १३९९ या क्रमांकाच्या ऍक्टिव्हा स्कुटीवर आले होते. या गाडीच्या पुढील बाजूस असलेल्या रिकाम्या जागेत पैश्यांची पिशवी ठेवण्यासाठी वाकले असता त्यांचा गाडीच्या हँडलवरील हात सटकला आणि ते काही सेकंदासाठी खाली वाकल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी १५ लाख असलेली कापडी पिशवी पळवून पसार झाले. दरम्यान, परिसरातील काही सीसीटिव्हीच्या कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे.
















