नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरासमोर भाजपाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांच्या हत्येच्या कटाचा गंभीर आरोप केला आहे. भाजप अरविंद केजरीवालांचा निवडणुकीत पराभव करू शकले नाही म्हणून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
”पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या दमदार विजयानंतर भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. आज पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे गुंड मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. त्यांनी अरविंद केजरीवालांच्या घराची तोडफोड केली. त्यांना जाणीवपूर्वक पोलिस घेऊन गेले. राजकारण फक्त बहाणा आहे. हे थेट गुंडागर्दीचं प्रकरण आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत गुंड पोहोचू शकतात का?” असा सवाल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला.
आप नेते संजय सिंह यांनीही ट्विट करून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना रोखण्याऐवजी दिल्ली पोलिस त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. लक्षात ठेवा, सर्वांचा हिशोब घेतला जाईल. ही लोकशाही आहे, इथे वेळ आल्यावर लोक तुम्हाला मतांच्या लाठ्या मारतील, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचे धरणे आंदोलन होते. त्यांनी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू केले. केजरीवालांनी काश्मीर फायलींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेले 150 ते 200 भाजप कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी आले. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक 2 बॅरिकेट्स तोडून केजरीवालांच्या निवासस्थानावर पोहोचले आणि घोषणाबाजी करू लागले. आंदोलकांसोबत एक पेंट डबा होता. त्यांनी निवासस्थानाच्या गेटवर रंग टाकला. याप्रकरणी पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.